• लॉकडाऊनमध्ये गरजूंचा आधार ठरलेल्या घर घर लंगरसेवेचा समारोप सलग 92 दिवस गरजूंना दिले साडे तीन लाख जेवणाचे पाकिट

    अहमदनगर(प्रतिनिधी)- कोरोनाच्या संक्रमणापासून वाचण्यासाठी सुरु झालेल्या लॉकडाऊनमध्ये कोणी उपाशी राहू नये यासाठी मागील 92 दिवसापासून सुरु करण्यात आलेल्या घर घर लंगरसेवेचा रविवार दि.20 जून रोजी समारोप करण्यात आला. या 92 दिवसात साडे तीन लाख जेवणाचे पाकिट गरजूंना वितरीत करण्यात आले असून, 15 ते 20 हजार गरजूंनी या सेवेचा लाभ घेतला असल्याची माहिती हरजितसिंह वधवा यांनी दिली. लॉकडाऊन मध्ये जेवण वाटपाचे कार्य करीत असताना चांगले-वाईट मनाला चटका देणारे संवेदनशील प्रसंग अनुभवयास आले. प्रारंभी फक्त डबे पोहोचविण्याचे कार्य हाती घेण्यात आले. नंतर किराणा किटचे वाटप, नागरिकांना मार्गदर्शन, मुक्या प्राण्यांसाठी जेवण, जे अडचणी आहेत त्यांच्या मदतीसाठी घर घर लंगर सेवेची टीम सदैव उभी राहिली. शीख, पंजाबी आणि लायन्स क्लबच्या वतीने आरंभ करण्यात आलेल्या लंगरसेवेला तिसर्‍याच दिवशी सिंधी, जैन, गुजराती समाजातील स्वयंसेवक सहभागी झाले. लॉकडाऊनमध्ये शहरातील सर्व हॉटेल, कॅन्टीन, मेस बंद झाले असताना शहरात अडकलेले परप्रांतीय कामगार, विद्यार्थी, गरजू नागरिकांना जेवणाचे डबे पोहचविण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. हे सामाजिक कार्य चालू असताना हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई, जैन, गुजराती, सिंधी, पंजाबी सर्वच धर्मियांचे सेवेदार या लंगरसेवेत सहभागी झाले. कोणी घरुन डबे बनवून दिले. तर कुणी किराणा सामान दिले. मार्च, एप्रिल व मे या काळात अनेक मोठे सण आले. परंतु सर्व घरी बसले असल्याने ते सण लोकसहभागातून लोकांकरिता अन्नदान करून साजरे करण्यात आले. त्यात वैशाखी, महावीर जयंती, प.पू. संत आनंदऋषीजी महाराज स्मृती दिन, हनुमान जयंती, महाराष्ट्र दिन, कामगार दिवस, संत कंवरराम जयंती, महाप्रभुजी प्रगत्या उत्सव, रमजान ईद, गुरु हरगोविंदसिंग प्रकाश उत्सव आदी सण, उत्सव या ठिकाणाहून साजरे करण्यात आले. लंगरसेवेसाठी जैन समाज, कुष्ठधाम, आनंद धाम, गुरुद्वारा भाई दयासिंग जी, नागर गुजराती समाज, शरद मुनोत गौरव फिरोदिया, कौस्तुभ सिरहत्ती, आर.व्ही. अ‍ॅबोट, अजय पंजाबी, जीवित राम हिरानंदानी, उद्धव तलरेजा, दिनेश चोपडा, ईश्‍वर बोरा, सेवाप्रीत, जी.एन.डी. ग्रुप, एक हात मदतीचा, व्यवहारे मॅडम, सोनवणे मॅडम, प्रल्हाद धूपर, संतोष तोडकर, जय आनंद ग्रुप, मार्केट यार्ड मशिनरी असोसिएशन, रेखा ठाकुर, काकडे मॅडम आदिंनी सढळ हाताने मदत केली. कोरोना संकटकाळाच्या प्रारंभी तीन महिन्याच्या कालावधीत ज्या वेळेस कोणी बाहेर निघायला तयार नव्हतं सुरुवातीला त्यावेळेस घरापर्यंत पोचवणे हा विषय जिक्रीचा होता. परंतु सेवादार कुठे न थांबता फिजीकल डिस्टन्सचे पाळन करुन ही सेवा देण्यात आली. साखर कामगारांच्या बैलांना पायांवर वाहन बसविण्याकरिता मदत, ज्यांना मेडिकल सुविधा पाहिजे त्यांना मेडिकलची मदत व मार्गदर्शन, विविध परवानगीसाठी सहकार्य, रेल्वे स्टेशन, बस स्थानक येथे परप्रांतीयांना डबे वाटप, सिव्हिल हॉस्पिटल, बूथ हॉस्पिटल आणि शहरातील सुमारे 22 हॉस्पिटलला सकाळ-संध्याकाळ रोज डबे वाटप, खर्‍या गरजूंना पोलीसांच्या माध्यमातून किराणा किटचे वाटप करण्यात आले. टॉप अप पेट्रोल पंम्पापासून सुरु झालेल्या या लंगरसेवा पोलीस मुख्यालय येथून शहरात व्यापक प्रमाणात राबविण्यात आली. शेवटच्या टप्प्यात प्रोफेसर चौक येथील पराठा हाऊसमधून ही सेवा देऊन 92 व्या दिवशी लंगरसेवेचा समारोप करण्यात आला आहे. यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक अखिलेशकुमार सिंह, अप्पर पोलीस अधिक्षक सागर पाटील, पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके तसेच संपूर्ण पोलिस खात्याचे अधिकारी व कर्मचार्‍यांनी सहकार्य केले. या संकटकाळात अनेक लोक सेवा करीत असताना एकमेकांशी जोडले जाऊन लंगरसेवा व्यापक बनली. लंगरसेवा करीत असताना सेवेदारांना कोणी शिव्या दिल्या, कोणी आशीर्वाद दिले, कुणी दमदाटी देखील केली, तर कुणी मायेची हात फिरवून या सेवाकार्यासाठी उभे राहिले. लंगरसेवेत प्रशांत मुनोत, हरजितसिंह वधवा, किशोर मुनोत, जस्मितसिंह वधवा, सुनिल छाजेड, विपुल शहा, राहुल बजाज, राजा नारंग, टोनी कुकरेजा, सुनिल मेहतानी, दामोदर माखीजा, गोविंद खुराणा, सनी वधवा, नारायण अरोरा, रोहित टेकवाणी यांनी योगदान दिले. रविवार दि.21 जून हा या सेवेचा शेवटचा दिवस असून, त्यापुढे जेवणाचे डबे तयार करून देणे बंद करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव अजून संपला नसल्याने सेवेदारांची सेवा इतर माध्यमातून सुरु राहणार आहे.