• हाजी अजीजभाई सामाजिक प्रतिष्ठान व मराठी पत्रकार परिषदच्या वतीने चाईल्ड लाईनच्या टिमला रेनकोटचे वाटप चाईल्ड लाईनच्या सदस्यांना रेनकोट देऊन आनखी काम करण्यास प्रोत्साहन देण्यात आले -हरजितसिंह वधवा

    अहमदनगर (प्रतिनिधी)- बालकामगार, बालभिक्षेकरी, बालविवाह, बालकांचे लैंगिक शोषण आदी अल्पवयीन मुलांच्या प्रश्‍नांवर 24 तास कार्य करणार्‍या चाईल्ड लाईनच्या टिमला हाजी अजीजभाई चष्मावाला सामाजिक प्रतिष्ठान व मराठी पत्रकार परिषदच्या वतीने रेनकोटचे वाटप करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते हरजितसिंह वधवा यांच्या हस्ते चाईल्ड लाईनच्या सदस्यांना रेनकोट वितरीत करण्यात आले. यावेळी मराठी पत्रकार परिषदचे नाशिक विभागीय सचिव मन्सूर शेख, आफताब शेख, नवेद शेख, जाहिद शेख, चाईल्ड लाईनचे केंद्र समन्वयक महेश सुर्यवंशी, समुपदेशक अलिम पठाण, शाहिद शेख, अब्दुल खान, राहुल कांबळे, प्रविण कदम, पूजा पोपळघट, अंजू वाकचौरे, राहुल वैराळ आदी उपस्थित होते. प्रास्ताविकात मन्सूर शेख यांनी चाईल्ड लाईन लहान मुलांचे प्रकरण दिवस-रात्र एक करुन हाताळत असतात. ऊन, वारा, पाऊसाची तमा न बाळगता त्यांना आलेल्या प्रकरणासाठी धावपळ करावी लागते. पावसाळ्यात मोटारसायकलवर फिरताना त्यांना भिजत-भिजत जावे लागत आहे. सामाजिक बांधिलकीच्या भावनेने त्यांच्यासाठी रेनकोटची व्यवस्था करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. हरजितसिंह वधवा म्हणाले की, अल्पवयीन मुलांचे बालपण वाचवण्यासाठी, त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी व त्यांना हक्काचा निवारा देऊन मदतीचा हात देण्याकरिता चाईल्ड लाईन कार्यरत आहे. कोरोनानंतर चाईल्ड लाईनचे काम अधिक वाढले आहे. लहान मुलांचे प्रकरण अधिक आढळून येत असून, कोरोनाने मयत झालेल्या पालकांचे अल्पवयीन मुलांचे दत्तक प्रकरणी समाजमाध्यमातून चुकीच्या पध्दतीने संदेश प्रसारित केले जात आहे. चाईल्ड लाईन मोठ्या जबाबदारीने कोरोनाच्या संकटकाळात काम करीत आहे. पावसाळ्यात त्यांना लहान मुलांचे प्रकरण हाताळताना सदर ठिकाणी वेळेवर पोहचणे आवश्यक असते. यासाठी हाजी अजीजभाई सामाजिक प्रतिष्ठान व मराठी पत्रकार परिषदने त्यांना रेनकोटची मदत देऊन एकप्रकारे आनखी काम करण्यास प्रोत्साहन दिले असल्याचे त्यांनी सांगितले. तर प्रतिष्ठानच्या विविध सामाजिक कार्याचे कौतुक केले. पूजा पोपळघट यांनी चाईल्ड लाईनमध्ये काम करताना मुलांच्या सुरक्षिततेचा विचार करता ऊन, वारा, पाऊसाची तमा न बाळगता काम करावे लागत असते. रात्री देखील भर पावसात भिजत जावे लागते. यामुळे काम करताना अडचणी आल्यास मनात नैराश्याची भावना येते. मात्र अशा सामाजिक संघटनांनी प्रोत्साहन दिल्यास काम करण्याचे हुरुप येते. हाजी अजीजभाई सामाजिक प्रतिष्ठान व मराठी पत्रकार परिषदने मोठा विश्‍वास दाखवून मदत दिली असून, काम करण्यास आनखी बळ मिळणार असल्याची भावना तीने व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका धारवाले यांनी केले. आभार ऋतूजा नडोणे यांनी मानले.