• घर घर लंगसेवा शहरात पुन्हा कार्यान्वीत निम्मे शहर हॉटस्पॉट असल्याने सर्वसामान्यांची बिकट परिस्थिती लंगरसेवेच्या माध्यमातून मिळणार जेवण

    अहमदनगर(प्रतिनिधी)- शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने निम्मे शहर हॉटस्पॉट घोषित झाले आहे. या भागात राहणार्‍या हातावार पोट असलेल्या सर्वसामान्य कामगार व नागरिकांची भूक भागवण्यासाठी 1 आठवड्याच्या विश्रांतीनंतर पुन्हा प्रशासनाच्या विनंती वरुन घर घर लंगसेवा कार्यान्वीत करण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यापासून शहरात कोणी उपाशी राहू नये यासाठी सीख, पंजाबी, जैन, गुजराथी व सिंधी समाज, आंतरराष्ट्रीय लायन्स क्लब, दानशूर व्यक्ती आणि पोलीस दलाच्या योगदानाने लॉकडाऊनच्या मागील तीन महिन्यापासून लंगर सेवा सुरु होती. सर्व व्यापार व उद्योगधंदे सुरळीत झाल्याने ही सेवा स्थगित करण्यात आली. मात्र शहरात कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढल्याने मुख्य बाजारपेठसह निम्मे शहर हॉटस्पॉट झाले आहे. यामुळे अनेकांचे रोजगार बुडून हातावर पोट असलेल्या कामगारांपुढे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. ही जाणीव ठेऊन 1 जुलै गुरुपौर्णिमेच्या दिवसापासून ही सेवा सुरु करण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाच्या मदतीने ही सेवा सध्या चालू असून, नागरिकांना संध्याकाळचे एक वेळेसचे जेवण दररोज देण्यात येणार आहे. पोलीस मुख्यालय येथील सभागृहात हायजनिक पध्दतीने व फिजाकल डिस्टन्सचे पालन करुन जेवण बनविण्यात येत आहे. या लंगरसेवेला 7 जुलै रोजी 101 दिवस पुर्ण होत असून, 3 लाख 65 हजार डबे आज पर्यंत वितरीत करण्यात आल्याची माहिती हरजितसिंह वधवा यांनी दिली. सदर उपक्रम पोलीस अधिक्षक अखिलेशकुमार सिंह, अप्पर पोलीस अधिक्षक सागर पाटील, पोलीस उपअधिक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. लंगरसेवेत हरजितसिंह वधवा, प्रशांत मुनोत, सुनिल छाजेड, किशोर मुनोत, करन धुप्पड, राजा नारंग, सनी वधवा, जस्मितसिंह वधवा, सिमर वधवा, टोनी कुकरेजा, राहुल बजाज, सुनिल मेहतानी, रोहित टेकवानी, संदेश रपारिया, नारायण अरोरा, गुरभेजसिंग, दुर्गाप्रसाद क्षत्रीय, शरद बेरड, पुरुषोत्तम बिट्टी, प्रमोद पंतम आदि सेवादार म्हणून काम पाहत आहे.