• घर घर लंगर सेवेच्या उल्लेखनीय कार्याबद्दल हरजितसिंह वधवा यांचा गौरव टाळेबंदीत माणसे दुरावत असताना लंगर सेवेने माणुसकीची भावना जागृत केली -आ.संग्राम जगताप

    अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरात मागील सात ते आठ महिन्यांपासून दीन-दुबळे व गरजूंची भुक भागविणार्‍या घर घर लंगर सेवेच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य करुन सामाजिक कार्याचा एक वेगळा ठसा उमटविणारे हरजितसिंह वधवा यांचा नगर- औरंगाबाद रोड येथील टॉपअप पेट्रोल पंम्प येथे गौरव करण्यात आला. आमदार संग्राम जगताप व श्रीरामपूरचे विभागीय पोलीस उपअधिक्षक संदीप मिटके यांच्या हस्ते वधवा यांना गौरविण्यात आले. यावेळी जनक आहुजा, प्रितपालसिंग धुप्पड, अनिश आहुजा, जतीन आहुजा, तरन नारंग, किशोर मुनोत, अमरजितसिंग वधवा, मनयोगसिंग माखिजा, सरबजितसिंग अरोरा, निप्पू धुप्पड, अभिमन्यू नय्यर, राहुल बजाज, कुकरेजा, विपुल शहा, सुनिल छाजेड, मोहन चोपडा, मनोज मदान, अतुल डागा, धनेश खत्ती, दिनेश भाटीया, राजा नारंग, बलजित बिलरा, सनी वधवा, वहाब सय्यद आदिंसह घर घर लंगर सेवा ग्रुप, तिरंगा ग्रुप व जीएनडी सेवा ग्रुपचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविकात जनक आहुजा म्हणाले की, संकटकाळात घर घर लंगरसेवेने गरजूंना आधार देण्याचे कार्य केले. टाळेबंदीत हरजितसिंह यांच्या पुढाकाराने टॉपअप पेट्रोल पंम्प येथून गरजूंना दोन वेळचे जेवणाचे डबे पुरविण्याची सेवा सुरु झाली. ही सेवा पुढे लंगर सेवेच्या रुपात पुढे येऊन लाखो लोकांची भूक भागविण्याची माध्यम बनल्याचे त्यांनी सांगितले. आमदार संग्राम जगताप म्हणाले की, कोरोनात माणसे माणसापासून दुरावत असताना घर घर लंगर सेवेने सामाजिक कार्य उभे करुन माणुसकीची भावना जागृत केली. कोरोनाच्या टाळेबंदीमुळे हातावर पोट असलेल्यांचा रोजगार बुडाला आहे. तर अनेकांना नोकर्या गमवाव्या लागल्या. अशा परिस्थितीमध्ये कोट्यावधी रुपये खर्च लाखो लोकांची भूक भागवली. तर परप्रांतात घरी जाणार्‍या नागरिकांना एक प्रकारे आधार दिला. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी शहरात काढा वाटपाचा उपक्रम घेऊन कोरोनाचे संकट थोपवण्याचे कार्य केले. लंगर सेवेच्या सेवादाराची टिम हरजितसिंह वधवा यांनी उभी करुन त्यांना एक प्रकारे दिशा देण्याचे कार्य केले. शहराच्या इतिहासात सामाजिक कार्यामध्ये घर घर लंगर सेवेचे कार्य विसरता येणारे नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. श्रीरामपूरचे विभागीय पोलीस उपअधिक्षक संदीप मिटके यांनी घर घर लंगर सेवेचे आपण स्वत: एक घटक राहून कार्य केले. हे सामाजिक कार्य जवळून पाहिल्याने भावनेच्या पलिकडे शब्दात न मांडता येणारी ही सेवा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हरजितसिंह वधवा यांचा वाढदिवसाचे औचित्य साधून करण्यात आलेल्या या गौरव सोहळ्यात वधवा यांचा उपस्थितांनी सत्कार करुन अभिष्टचिंतन केले. उपस्थितांचे आभार अनिश आहुजा यांनी मानले.