• गरजू विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणासाठी साधने देण्याचे आवाहन घर घर लंगर सेवा गरजू विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देणार स्मार्टफोन, लॅपटॉप व संगणक

    अहमदनगर(प्रतिनिधी)- कोरोना महामारीच्या संकटात शाळा बंद असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी त्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. मात्र सर्वसामान्य व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांकडे ऑनलाईनसाठी लागणारे साधन नसल्याने ते शिक्षणापासून वंचित राहत आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेता यावे यासाठी गुरु अर्जुन सामाजिक प्रतिष्ठान संचलित घर घर लंगर सेवेच्या वतीने शहरातील नागरिकांना वापरात नसलेले जुने स्मार्टफोन, लॅपटॉप व संगणक मदत म्हणून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही मदत गरजू विद्यार्थ्यांना देण्यात येणार असल्याची माहिती हरजितसिंह वधवा यांनी दिली. कोरोनामुळे शिक्षण पध्दतीत अमुलाग्र बदल झाला आहे. वर्चुअल शिक्षणाला महत्त्व आले असून, अनेक वर्ग ऑनलाईन घेतले जात आहे. मात्र या ऑनलाईन शिक्षणाच्या युगात आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थी मागे राहत आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार बुडाला आहे. तर अनेकांना आपल्या नोकर्‍या गमवाव्या लागल्या आहेत. कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठिण झाले असताना अशा कुटुंबीय विद्यार्थ्यांना स्मार्टफोन किंवा संगणक घेऊ शकत नाही. या परिस्थितीचे भान ठेवून घर घर लंगर सेवेने अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. वापरात नसलेले जुने अतिरिक्त फोन, लॅपटॉप व संगणक नागरिकांकडून जमा केले जाणार आहेत. ही उपकरण देणार्‍यांकडून व घेणार्‍यांकडून एक फॉर्म भरुन घेतला जाणार आहे. त्यात नाव, पत्ता, मोबाईलचे किंवा लॅपटॉप चे आयएमईआय/सीरियल नंबरचा व आधार कार्डचा समावेश असणार आहे. पहिल्या टप्प्यात महानगरपालिकेच्या परिसरात येणार्‍या शाळा घेण्यात येणार आहेत. त्यानंतर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना देखील ही साधने उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या गरजूंसाठी असलेल्या शैक्षणिक चळवळीत हातभार लावण्यासाठी ऑनलाईनसाठी लागणारी साधने उपलब्ध करुन सहकार्य करण्याचे आवाहन हरजितसिंग वधवा, प्रशांत मूनोत, जस्मीतसिंग वधवा, सनी वधवा, सुनील छाजेड, किशोर मुनोत, राजा नारंग, राहुल बजाज, करण धुप्पड यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी व संपर्कासाठी 9423162727 व 9028079699 हे व्हॉट्सअप नंबर उपलब्ध करुन देण्यात आले आहे.