• घर घर लंगरसेवेचे कार्य इतिहासात नोंदले जाईल -अखिलेशकुमार सिंह अहमदनगर जिल्हा पोलिस दलाच्या वतीने लंगर सेवेच्या सेवादारांचा सन्मान

    अहमदनगर(प्रतिनिधी)- कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर सर्वांचे जनजीवन व्यथित झालेला असताना, घर घर लंगर सेवेच्या माध्यमातून भुकेलेल्यांना दोन वेळचे जेवण मिळाले. लंगर सेवेच्या सेवेदारांनी माणुसकीला नवजीवन देऊन लाखो कुटुंबियांची वाताहत थांबवली. हे कार्यकर्ते खर्‍या अर्थाने देवदूत ठरले. घरघर लंगर सेवेचे काम भविष्यामध्ये इतिहासात सुवर्ण अक्षरांमध्ये नोंदले जाईल. असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी केले. पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर अहमदनगर जिल्हा पोलिस दलाच्या वतीने घर घर लंगरसेवेत सहभागी संस्था व सेवेदारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक सिंह बोलत होते. फिजीकल डिस्टन्स, सॅनीटायझर व मास्कचा वापर आदी नियमांचे पालन करून झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी शहर पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके, पो.नि. दशरथ हटकर, कोतवालीचे पो.नि. लोखंडे, तोफखाना पोलीस स्टेशनचे पो.नि. हारुन मुलानी, भिंगार कॅम्पचे ए.पी.आय. पाटील, जनक आहुजा, प्रितपालसिंह धुप्पड, जीवित्रम हिरानंदानी आदिंसह पोलीस अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी कोरोनाच्या लॉकडाऊन काळात सेवा बजावताना शहीद झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. डॉ. अमोल बागुल यांनी यावेळी बासरी वादन करून पोलीसांना आदरांजली वाहिली. हारुन मुलानी यांनी प्रास्ताविक केले. हरजीतसिंह वधवा यांनी घर घर लंगरसेवेच्या कार्याची माहिती दिली. लंगरसेवेचे सेवेदार रीतू अ‍ॅबट, विपुल शाह, डॉ.अमोल बागुल, किशोर मुनोत, सुनील छाजेड, अनिश आहुजा यांनी मनोगत व्यक्त केले. पोलीस उपाधिक्षक संदिप मिटके म्हणाले की, शहरातील मान्यवर सामाजिक संस्थांच्या माध्यमातून सुमारे 79 दिवस राबविण्यात आलेला हा उपक्रम खरोखरच प्रेरणादायी व माणुसकीला अनोखे अधिष्ठान प्राप्त करून देणारा आहे. यापुढील काळात देखील या सर्व संस्थांसह सामाजिक उत्तरदायित्वाची भूमिका निभावण्याचे काम अहमदनगर जिल्हा पोलीस दल सतत करीत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. अप्पर पोलीस अधिक्षक सागर पाटील यांनी देखील या सामाजिक कार्याचे कौतुक करुन शुभेच्छा संदेश दिले. लंगरसेवेच्या 60 हून अधिक सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान यावेळी जिल्हा पोलिस दलाच्या वतीने मानपत्र देऊन पोलीस अधिक्षक अखिलेशकुमार सिंह यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी लंगरसेवेच्या माहितीपटाचे अनावरण करण्यात आले. यावेळी लंगर सेवेचे प्रशांत मुनोत, ईश्‍वर बोरा, दिनेश चोपडा, महेश धुमाळ, जस्मीतसिंह वधवा, सनी वधवा, राजा नारंग, राहुल बजाज, नारायण अरोरा, विनायक कूलथे, विकी मेहरा, सुनील मेहतानी, दामोदर माखिजा, गोविंद खुराणा, संदेश रपारिया, मन्नित भल्ला, अमोल विधाते, सूरज तोरणे, रोहित टेक्वानी, टोनी कुकरेजा, मनु कुकरेजा, विजय मनी, गुरभेज सिंह, हरविंदरसिंह नारंग आदि सेवादार उपस्थित होते. पोलीस प्रशासनाने दिलेल्या सहकार्याबद्दल लंगरसेवेच्या वतीने आभार मानण्यात आले. महिला पोलीस गीता कळमकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने झाला.