नटराज हॉटेल येथील गुरु अर्जुनदेव कोविड सेंटरमध्ये बरे झालेल्या कोरोना रुग्णांवर फुलांची उधळण करुन होळी साजरी घर घर लंगर सेवा व महापालिकेचा उपक्रम शहरातील आनंद लॉन, शासकीय पॉलिटेक्निक कॉलेजस इतर ठिकाणी कोविड सेंटर होणार सुरु -आयुक्त गोरे

अहमदनगर (प्रतिनिधी)- घर घर लंगर सेवा व महापालिकेच्या वतीने हॉटेल नटराज येथे सुरु करण्यात आलेल्या गुरु अर्जुनदेव कोविड सेंटरमध्ये उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांवर फुलांची उधळण करुन होळी साजरी करण्यात आली. कोरोना रुग्णांचे आत्मबळ वाढविण्यासाठी घर घर लंगर सेवेच्या वतीने हा उपक्रम घेण्यात आला. तसेच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना घरी न थांबता कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल होण्याचे आवाहन करण्यात आले. होळी निमित्त घेण्यात आलेल्या या आगळ्या-वेगळ्या उपक्रमासाठी महापौर बाबासाहेब वाकळे, मनपा आयुक्त शंकर गोरे, उपायुक्त यशवंत डांगे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे, घर घर लंगर सेवेचे हरजितसिंह वधवा, प्रशांत मुनोत, राहुल बजाज, किशोर मुनोत, राहुल बजाज, मन्नू कुकरेजा, टोनी कुकरेजा, कैलाश नवलानी, सुनील थोरात, गोविंद खुराणा, दलजीतसिंह वधवा, कमलेश गांधी, कोविड सेंटरचे डॉ. प्रदीप कळमकर, योगेश तांबे, सुरेखा माळी, आश्‍विनी खरात, कृष्णकांत घोलप आदी उपस्थित होते. मनपा आयुक्त शंकर गोरे म्हणाले की, महापालिकेने घर घर लंगर सेवेच्या सहकार्याने दोन ठिकाणी कोविड सेंटर सुरु केले आहे. दोनशे 210 रुग्णांची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरात वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन एक ते दोन दिवसात आनंद लॉन व शासकीय पॉलिटेक्निक कॉलेज येथे कोविड सेंटर सुरु करण्यात येणार आहे. तसेच अजून काही ठिकाणी कोविड सेंटरसाठी जागेची पहाणी सुरु असून, कोणत्याही कोरोना रुग्णांवर उपचार कमी पडणार नसून याची दक्षता घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर कोरोनाची लक्षणे आढळणार्‍या रुग्णांनी घरी न थांबता कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल होण्याचे त्यांनी आवाहन केले. बाबासाहेब वाकळे यांनी कोरोनाचे संक्रमण पसरणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यावी. एकत्र न येता घरच्याघरी होळी साजरी करुन शासनाच्या निर्देशाचे व नियमांचे पालन करण्याचे त्यांनी आवाहन केले. तर या उपक्रमाने कोरोना रुग्णांच्या मनातील भिती निश्‍चित दूर होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हरजितसिंह वधवा म्हणाले की, कोरोना रुग्णांना माणुसकीच्या भावनेने घर घर लंगर सेवेने आधार देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. घरापासून लांब असलेल्या रुग्णांना होळी सणाचा आनंद मिळाला. होळी सणात कोरोनाचे संक्रमणाने नव्हे, तर होळीत कोरोनाचे दहन होणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. संध्याकाळी कोविड सेंटरच्या प्रवेशद्वारात कोरोनाचे प्रतिकात्मक दहनाची होळी पेटविण्यात आली. घर घर लंगर सेवा व महापालिकेच्या वतीने दि.4 मार्च पासून नटराज हॉटेल येथे सर्वांसाठी तर जैन पितळे वसतीगृहात फक्त महिलांसाठी निशुल्क कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहे. यामध्ये घर घर लंगरसेवेच्या वतीने सर्व रुग्णांना नाष्टा व दोन वेळच्या जेवणाची सोय करण्यात आली आहे. या उपक्रमास अहमदनगर पोलीस दल व लायन्स क्लबचे सहकार्य लाभत आहे. कोविड सेंटरमध्ये प्ले रुमची देखील व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती वधवा यांनी दिली.