कोरोनाच्या संकटकाळात योगदान देणार्यांनी माणुसकी जपली -डॉ. राजेंद्र धामणे रोटरी क्लब ऑफ अहमदनगर इंटीग्रेटीच्या वतीने कोरोना महामारीत गरजूंना मदत पोहचविणार्यांचा कोरोना संवेदनवीर पुरस्काराने गौरव
अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रत्येकाने समाजात वावरताना माणुसकीने वागले पाहिजे. कोरोनाच्या संकटकाळात योगदान देणार्यांनी खर्या अर्थाने माणुसकी जपली. माणुसकीचे कर्तव्य पार पाडल्याने कोरोनाशी यशस्वी लढा आपल्याला देता आला असल्याची भावना माऊली सेवा प्रतिष्ठानचे डॉ. राजेंद्र धामणे यांनी व्यक्त केले. रोटरी क्लब ऑफ अहमदनगर इंटीग्रेटीच्या वतीने कोरोना महामारीच्या संकटकाळात सर्वसामान्य गरजू नागरिकांसाठी विविध प्रकारची मदत पोहचविणारे हरजितसिंह वधवा, डॉ. विद्या देशमुख, अरुण बलिद, डॉ. सतीश राजुरकर, कल्पना ठुबे, डॉ. विद्या देशमुख, साहेबान जहागीरदार, मिलिंद कुलकर्णी यांना कोरोना संवेदनवीर पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी डॉ. धामणे बोलत होते. माजी समाज कल्याण अधिकारी डॉ. रफिक मुन्शी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून न्यू आर्टस कॉमर्स अॅण्ड सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्कर झावरे, अजित पवार, रोटरीचे प्रकल्प प्रमुख जावेद शेख, सचिव सुयोग झंवर उपस्थित होते. प्रास्ताविकात जावेद शेख यांनी कोरोनाच्या संकटकाळात माणूस माणसापासून दुरावत असताना अनेकांनी आपली व आपल्या कुटुंबाची पर्वा न करता सामाजिक योगदान दिले. मोठ्या संवेदनशीलतेने केलेल्या कार्याचा सन्मान म्हणून अशा व्यक्तींना रोटरीच्या वतीने कोरोना संवेदनवीर पुरस्काराने गौरविण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच रोटरीच्या कोविड सेंटर व सामाजिक उपक्रमाची त्यांनी माहिती दिली. रफिक मुन्शी यांनी शिक्षण म्हणजे बेरीज वजाबाकी नव्हे, तर शिक्षणाने मनुष्यात सामाजिक संवेदना निर्माण झाल्या पाहिजेत. या संकटकाळात अनेकांनी गरजूंना मदतीचा हात दिल्याने कोरोना सारखे भयानक संकट दूर होत आहे. या संकटकाळात सर्वांनी जात, धर्म व पंथ विसरुन केलेले कार्य दिशादर्शक व प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. हरजितसिंह वधवा यांनी घर घर लंगर सेवेच्या उपक्रमाची माहिती दिली. प्रा.भास्कर झावरे म्हणाले की, शिक्षणाच्या उच्च पदवीचे शहाणपण व संवेदनशीलतेत रुपांतर होणे गरजेचे आहे. फक्त शिक्षणाने समाज सावरणार नसून त्याला संस्काराची जोड द्यावी लागणार आहे. शिक्षण व संस्कारानेच कोरोनाच्या संकटकाळात सामाजिक कार्य उभे राहिले आहे. समाजात माणुसकी टिकविण्यासाठी नव्या पिढीने इतरांसाठी जगण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी रोटरीचे हेमंत लोहगावकर, आसाराम खाडे, डॉ. रिजवान अहमद, अनिश आहुजा आदी विविध क्षेत्रात सामजिक योगदान देणारे व्यक्ती उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंदना शहा-गांधी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अवधूत मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्स यांचे सहकार्य लाभले. आभार सुयोग झंवर यांनी मानले.