घर घर लंगरसेवा व पोलीस उपअधिक्षक मिटके यांचे गृहमंत्रींकडून कौतुक लोककलावंतांना अन्न-धान्यासह किराणा किटचे केले होते वाटप
अहमदनगर (प्रतिनिधी)- लोककलावंतांसमोर कोरोना महामारीमुळे उपासमारीची वेळ आली असताना पोलीस उपअधिक्षक संदीप मिटके यांच्या पुढाकाराने गुरु अर्जुन सामाजिक प्रतिष्ठान संचलित घर घर लंगर सेवेच्या वतीने शहरातील लोककलावंतांना अन्न-धान्यासह किराणा किटचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाची राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दखल घेत या उपक्रमाचे कौतुक केले. गृहमंत्री देशमुख यांनी त्यांच्या वैयक्तिक ट्विटर अकाऊंटवरुन या उपक्रमाची प्रसिध्द झालेली बातमी व फोटो शेअर करीत पोलीस दलातील उपअधिक्षक संदीप मिटके व घर घर लंगर सेवा संस्थेने घेतलेला पुढाकार वाखाण्याजोगा असल्याचे म्हंटले आहे. कोरोनाच्या संकटकाळात लोककलावंतांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असताना या लोककलावंतांन आधार देण्यासाठी पोलीस दल व घर घर लंगर सेवेच्या वतीने 53 लोककलावंतांना या किटचे वितरण करण्यात आले होते. पोलीसांनी राबविलेल्या या उपक्रमाचे जिल्ह्यातील लोककलावंतांनी स्वागत करुन पोलीस दल व लंगर सेवेच्या सेवादारांचे आभार मानले आहे.